Sink the Bismarck !

एक जहाज बुडवण्यासाठी !


प्रास्ताविक :
मायबाप अभ्यासकांनो आणि वाचकांनो !

आज २४ मे २०२०. तसं ही खास करून लक्षात ठेवावी अशी तारिख नक्कीच नाही. पण आज पासून ७९ वर्षांपूर्वी म्हणजे २४ मे १९४१ साली अटलांटिक महासागरात डेन्मार्कच्या समुद्रधुनीत एक प्रचंड नाविक संग्राम सुरु झालेला होता, जो २७ मे १९४१ रोजी संपला. या नाविक संग्रामामुळे दुसऱ्या महायुद्धाचे पारडे जरी पूर्ण फिरले नाही तरी या संग्रामाचे दूरगामी परिणाम युद्धाच्या अंतिम निकालावर झाले यात वाद नाही. या चार दिवसात ३६०० हुन अधिक नौसनिकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेवर मी २०१५ साली माहितिलेख लिहायला घेतला होता, जो गेली पाच वर्षे अपुराच होता. यंदा या घटनेस ७९ वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे हा माहितिलेख मी नेट (मराठी नेट, इंग्रजी नाही !) लावून पूर्ण करून आज आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहे.

वास्तविक या लढाईचे दोन भाग केले जातात.

१. डेन्मार्क च्या समुद्रधुनीतील लढाई (२४ मे १९४१)
२. बिस्मार्कची अंतिम लढाई. (२५ मे ते २७ मे १९४१)

पण मी या लेखात दोन्ही भाग एकच करून माहिती सांगणार आहे.
या लढाईबाबत अनेक डिटेल्स उपलब्ध आहेत. अनेक अनुभवींच्या कथांच्या वेगवेगळ्या आवृत्या आहेत. मला जिथे योग्य संदर्भ आहे असे वाटल्या त्यांचाच वर आधारित माहिती मी इथे घेतली आहे. लेख जास्तीत जास्त माहितीपूर्ण आणि अचूक ठेवण्याचा प्रयत्न मी केलाय. वाचकांना किंवा कुणास अधिक माहिती असल्यास अवश्य सांगावे. सूचना, दुरुस्त्यांचे स्वागतच होईल.

संदर्भ :
१. youtube वरील अनेक माहितीपट
२. हिटलरचे महायुद्ध - वि. ग. कानेटकर
३. आंतरजालावरील असंख्य साधने.

मार्च १९४१. संपूर्ण युरोप युद्धाच्या  आगीत धगधगत होता . फ्रांस , बेल्जियम , नॉर्वे वगैरे  देश नाझी जर्मनीच्या  विळ्ख्यात  सापडले होते . रशिया , अमेरिका या बड्या राष्ट्रांचा अजून युद्ध प्रवेश व्हायचा होता.  एकाकी लढत होते ते फक्त ब्रिटन . लंडन वर लुफ्तवाफेची तुफानी बॉम्बफेक चालू होती . ब्रिटीश हवाईदल सुद्धा प्रतिहल्ले करत होते . नाझी हुकुमशहा आणि तत्कालीन नाझी जर्मनीचा सर्वेसर्वा अडॉल्फ हिटलर दिवसेंदिवस अस्वस्थ होत होता . त्याचे सर्वंकष उद्दिष्ट हे पूर्वेकडील प्रदेशात साम्राज्य विस्तार करणे हे होते. आणि तो प्रदेश म्हणजे पोलंड  आणि त्यापलीकडे पसरलेला रशिया !!

युदधा आधी जरी हिटलर ने रशियाशी अनाक्रमणाचा करार केलेला होता तरी  आज न उद्या जर्मन-रशिया संघर्ष होणार ही अटळ गोष्ट होती. गुप्तपणे जर्मनी ऑपरेशन बार्बारोसा या रशियावरील मोहिमेची जय्यद तयारी करीत होता . पण जोवर ब्रिटन शरण येत नाही तोवर त्याला पूर्वेकडे आघाडी उघडता येत नव्हती .एकाचवेळी पूर्व आणि पश्चिम आघाड्यांवर संघर्ष हिटलर  टाळत होता . ब्रिटीश प्रतिकार प्रामुख्याने दोन गोष्टींवर अवलंबून होता . एक म्हणजे पंतप्रधान चर्चिल आणि ब्रिटीश नागरिकांचे नैतिक मनोधैर्य आणि दुसरे म्हणजे ब्रिटनला अमेरिकेकडून समुद्रमार्गे  होणारा रसद पुरवठा . ब्रिटीश मनोधैर्य खच्ची करण्याचा यत्न  जर्मन हवाई दल लुफ्तवाफ बॉम्बिंग करून करत होते . मुख्य अडचण होती ती म्हणजे ब्रिटनला होणारा रसद पुरवठा तोडण्याची . जर्मन पाणबुड्या तसा प्रयत्न करीतही होत्या आणि त्यांना मर्यादित यशही येत होते. पण ब्रिटिश  आरमार हे बलाढ्य होते . जर्मनीला पाणबुड्यानबरोबर समुद्राच्या वरून युद्धनौकाच्या सहाय्याने एका आक्रमक पावित्र्याची  गरज भासत होती . 
पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस पराभूत जर्मनी वर अनेक बंधने लादण्यात आली होती . त्यानुसार जर्मनीस जास्तीत जास्त  ६ युद्धनौका ( १८८० ते १९०५ काळात बांधलेल्या ) , ६ स्कुझर , १२ विनाशिका  आणि १२ टोर्पिडो नौका इतकेच आरमार ठेवता येणार होते . पाणबुड्याना पूर्ण बंदी होती . मात्र १९३३ मध्ये जर्मनीत नाझी सत्ता आल्यावर मात्र गुपचूपपणे  यु बोट आणि युद्धनौकांची बांधणी सुरु झाली . यात उल्लेखनीय अशा ज्या युध्द नौका होत्या त्या अशा :-

१. जीसेनो (Gneisenau) 
2.शोर्न होस्ट ( Scharnhorst)
3.बिस्मार्क 
४. तिरपित्झ (Tirpitz). 

अमेरिकेकडून होणारा रसद पुरवठा तोडण्यासाठी एक योजना आखली गेली.  तिचे नाव Operation
Rheinubung. या मोहिमेत मुख्य सहभाग युद्धनौकांचा होणार होता . याशिवाय इतर अवजड स्कृझर्स
ही  होत्या . जर्मन  आरमार प्रमुख ऍडमिरल  रिडर याला या योजने विषयी यशाची बरीच खात्री होती.
ही मोहीम जर फत्ते झाली असती तर इंग्लंडला अमेरिकेकडून होणारा रसद पुरवठा बंद पडून त्यांना गुढगे टेकणे भाग पडणार होते आणि जवळपास सर्व युरोपवर जर्मन अधिराज्य स्थापित झाले असते. 

मात्र मे  १९४१ च्या  आधीच जीसेनो आणि शोर्न होस्ट या नौका ब्रेस्ट या पश्चिमी फ्रान्सच्या बंदरात असतांना ब्रिटीश हवाई दळाच्या बॉम्ब  हल्ल्यात सापडल्या . शोर्न होस्ट च्या इंजिनाचे नुकसान झाले आणि जीसेनो टोर्पिडो  हल्ल्यात जायबंदी झाली . तिरपित्झ चा कर्मचारी वर्ग खूपच नवीन  होता . आता Operation  Rheinubung ची सर्वस्वी जबाबदारी बलाढ्य  जर्मन युद्धनौका  बिस्मार्क  आणि प्रिन्स युजेन (Prinz Eugen,) या अवजड स्क्रुझर वर आली . बिस्मार्क ही  तत्कालीन युरोप मधील सगळ्यात बलाढ्य युद्धनौकांपैकी  एक होती . १९३६ मध्ये हम्बुर्ग मधील Blohm & Voss या गोदीत  तिची बांधणी सुरु झाली. १४ फेब्रुवारी १९३९ रोजी तिचे जलावतरण झाले .  २४ ऑगस्ट १९४० रोजी ती थाटात नाझी आरमारात सामील झाली . 

बिस्मार्क ची संक्षिप्त तांत्रिक माहिती :-



Displacement :- ५५४०० ( फुल्ली लोडेड )
वेग :- ३०-३५ समुद्री मैल 
लांबी - २५१ मीटर 
शस्त्रास्त्रे :-
१. दोन १५ इंची दोन  तोफांचा प्रत्येकी एक असे एकूण चार तोफ मचाण (turrets) - म्हणजे एकूण १५ इंची
८ तोफा 
२. बारा  ५. ९ इंची लघु तोंफा . 
३. सोळा ४.  इंची आणि  सोळा १. इंची तोफा . 
४. बारा ०. ७९ इंची विमान भेदी तोफा . 
५. चार अराडो  ए  आर १९६ विमान 
६. सुमारे २२०० कर्मचारी . 

बिस्मार्क चे चिलखती आवरणही जबरदस्त होते . बिस्मार्क आणि या कथेत पुढे येणाऱ्या युद्धनौकांची तांत्रिक माहिती साठी पहा :-

http://www.kbismarck.com/genedata.html

======================================================

वस्तुतः जल-रणांगणावर पाठवण्याच्या घाई घाईत  बिस्मार्क मध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या . तिच्या
वरील विमानभेदी तोफा जुन्या होत्या ज्या  इंग्लंड च्या प्रखर  हवाई हल्ल्यांना तोंड द्यायला असमर्थ होत्या . लुफ्तवाफ कडून  जर्मन  युद्ध नौकांना दिले जाणारे हवाई संरक्षण मर्यादित होते.  त्यामुळे ही  फारच गंभीर बाब होती . तिच्यावरचा बराचसा कर्मचारी वर्ग अनअनुभवी  होता.  २१ मे १९४१ रोजी  जर्मन व्यापित नॉर्वेत बिस्मार्क आणि प्रिन्स युजेन (Prinz Eugen,)  दाखल  झाल्या. 
बिस्मार्क चा कप्तान  होता कॅ . Ernst_Lindemann . शिवाय या मोहिमेची जबाबदारी सांभाळणारा
ऍडमिरल Günther Lütjens  सुद्धा बिस्मार्स्क वर जातीने हजार होता . त्यांच्या पुढे आव्हान होते ते म्हणजे या दोन्ही युद्ध नौकांना ब्रिटीशांच्या नजरेत न येता अटलांटिक महासागरात नेणे आणि अमेरिकेकडून येणाऱ्या रसद पुरवठा करणाऱ्या जहाजांना बुडवणे. त्यासाठी ते अटलांटिक मधील लंब्या रात्रीचा  उपयोग करून घेणार होते . तिकडे ब्रिटीश गुप्तचर यंत्रणाना या मोहिमेची भनक लागलीच होती .  त्याशिवाय त्यांना  जर्मन  व्याप्त नॉर्वेतील गनिमी तुकड्या  मदत करत  होत्याच . २१ मे  ला बिस्मार्क आणि प्रिन्स युजेन  नॉर्वेत  Bergen बंदरात उभ्या होत्या . बिस्मार्क वरील कर्मचारी वर्ग  डेक वर फिरत , मजा  करीत होता .  एका बलाढ्य , कोऱ्या करकरीत युद्ध नौकेवर काम करायला मिळणे म्हणजे  या युवा नौसैनिकांसाठी नक्कीच विशेष नवलाई चे आणि कौतुकास्पद असणार !  पण ही वादळा  पूर्वीची   शांतता होती  . दुपारी 1.15 वाजता आकाशात एका  विमानाची घरघर ऐकू आली  आणि  एक ब्रिटीश स्पिट फायर गिरट्या घालुन निघून गेले .  त्याने बंदरात उभ्या असलेल्या बिस्मार्क आणि प्रिन्स युजेन चे वरील छायाचित्र  टिपले  आणि गुप्तपणे या युद्धनौका अटलांटिक मध्ये पोहोचण्याची   योजना फोल ठरली . हा फोटो  पोस्ट बरोबर टाकला आहे.  



प्रत्यक्षात दोन जर्मन बी एफ १०९ विमाने या  युद्ध नौकांना हवाई संरक्षण देत होती, पण ब्रिटीश फ्लाइंगऑफिसर मायकल साक्लिंग ( Michael Suckling ) याने स्पिट फायर २६००० फुटावरून उडवून  ही छायाचित्रे घेतली.
 आता ब्रिटीश आरमार या नौकांना नोर्वेतच कोन्डण्याआधी बिस्मार्क आणि युजेन अटलांटिक मध्ये पोहोचणे जरूर झाले . २१ मे रोजी  १९:३० ला या युद्धनौकानी  इतर ३ विनाशिकांच्या संरक्षणात Bergen बंदर सोडले आणि आइसलंडला लांब वळसा घालून; ज्याला डेन्मार्कची सामुद्रधुनी म्हणून  ओळखले जाते त्या दिशेनी कूच केले . पोस्ट सोबतचा नकाशा पहा. प्रिन्स युजेन ची इंधनटाकी पूर्ण भरण्यात आली . पण घाईघाईत बिस्मार्क मात्र पूर्ण इंधन  न भरताच मोहिमेवर  निघाले. ही बाब अतिशय गंभीर होती आणि पुढच्या विनाशास कारणीभूत ठरली. आतापर्यंत या समुद्राधुनिमधून जर्मन  नौदलाने अनेक छापे घातले होते  आणि तेही  ब्रिटीश आरमाराकडून अडथळा न  होता.  यावेळीही तसेच घडेल या फाजील विश्वासाने घेतलेला हा आततायी निर्णय होता .  खुल्या समुद्रात पोहोचताच  मोहीम सुरु झाल्याची बातमी हिटलर ला कळवण्यात आली . २२ मे रोजी पहाटे  ४.३० ला ३ विनाशिका  वेगळ्या  झाल्या . २२ मे रोजीच दुपारी १२ ला अडमिरल  Lütjens ने डेन्मार्कच्या  सामुद्रधुनीकडे दोन्ही  युद्धनौका वळवण्याचा आदेश दिला आणि अटलांटिक मध्ये प्रवेश करण्यासाठी वाटचाल सुरु केली. 
तिकडे मायकल साक्लिंग ने पाठवलेले छायाचित्र बिस्मार्क चेच आहे  पटल्यावर ब्रिटीशांनीही आरमारी
जुळवाजुळव सुरु केली .  HMS नोर्फोल्क आणि HMS saffolk या अवजड स्कृझर डेन्मार्क समुद्राधुनीवर गस्त घालत होत्या . त्यांच्या मदतीला अजून दोन नौका पाठवण्यात आल्या . एक होती ती नवी कोरी युद्ध नौका प्रिन्स ऑफ वेल्स आणि दुसरी म्हणजे ब्रिटीश आरमाराची शान असलेली ध्वज नौका  HMS हूड  !!!! 
२३  मे ला १९:२२ वाजता जर्मन  युद्धनौकांवरील रेडीओ अधिकार्यांना  HMS saffolk ही  रडार वर १२. ५ किमी अंतरावर दिसली . प्रिन्स युजेन वरील रेडीओ अभियंत्यांनी HMS Saffolk  वरील एक संदेश भेदला. त्यावरून असे समजले की  HMS नोर्फोल्क आणि HMS saffolk या दोन युद्धनौकांना  बिस्मार्क आणि  युजेन डिटेक्ट झाल्या आहेत . रात्री २०.३० ला HMS नोर्फोल्क बिस्मार्क च्या तोफांच्या पल्ल्यात आली.  ऍडमिरल  Lütjens ने लगेच बिस्मार्क वरील  मुख्य तोफांना बत्ती देण्यास सांगितले . बिस्मार्क च्या १५ इंची तोफा कडाडल्या . एकूण ५ salvos  (योग्य मराठी शब्द सापडला नाही ) पैकी ३ नोर्फोल्क वर आदळले  आणि नोर्फोल्कने धूर सोडत सुरक्षित  अंतरावर माघार घेतली . मात्र या तोफांच्या धक्क्याने खुद्द बिस्मार्क वर बसवलेले FuMO  रडार निकामी झाले . आतापर्यंत बिस्मार्क ही पुढे चालत होती आणि युजेन तिच्या मागे येत होती . रडार निकामी झाल्याने परिणामतः  अडमिरल   Lütjens  ने प्रिन्स युजेन ला  पुढे  ठेवले  आणि बिस्मार्क  ला तिच्या मागे. (** जर्मन आरमार रडार चा मुख्य उपयॊग तोफखान्याचा मारा करण्यासाठी अचूक अंतर काढण्यासाठी करे तर उलटपक्षी ब्रिटीश आरमार शत्रू च्या नौका / विमाने शोधण्या साठी करत असे ). 
======================================================

एच . एम . एस . हूड  ही   जशी बलाढ्य युद्ध नौका होती तितकीच ती सुंदर सुद्धा   होती असे तिचे वर्णन केलेले आढळते.
(हुडची  संपूर्ण तांत्रिक माहिती  इथे मिळेल … http://www.hmshood.com/ship/ ).
१५ मे १९२० रोजी ब्रिटनच्या आरमारात ती थाटात सामील झाली होती . शाही ब्रिटीश  आरमाराची शान होती. शाही  ब्रिटीश नौदलाची ध्वजनौका बनण्याचा सन्मान तिला मिळाला होता.  १८ व्या शतकातील एका पराक्रमी ऍडमिरल  वरून तिचे नाव ठेवले होते. …. हर मेजिस्टी शिप   हुड  !!!!!! ब्रिटीश आरमाराचे प्रतिक म्हणून तिला जगात  सादर केले जात होते.    तिला Mighty Hood असे विशेषण हि मिळालेले होते आणि अनेक जहाजाना जशी   "unsinkable " अशी भ्रामक कल्पना  चिकटली जाते तशीच हूड ला ही चिकटली होती.  आता तिच्यावर जर्मन युद्ध नौका  बिस्मार्क  ला थोपवण्याची कामगिरी होती . तिच्या जोडीला प्रिन्स ऑफ वेल्स होतीच .  व्हाईस  ऍडमिरल  हॉलंड हुडचे नेतृत्व करत होता .  २३ मे १९४१ रोजी बिस्मार्क आणी प्रिन्स  युजेन डेन्मार्क च्या सामुद्रधुनीतून मार्गाक्रमण करीत उत्तर अटलांटिक च्या तोंडा कडे वाटचाल करत होत्या . त्यांचा पाठलाग HMS नोर्फोल्क आणि HMS saffolk  सुरक्षित अंतर राखून करत होत्या . डेन्मार्क ची  सामुद्रधुनी जिथे उत्तर अटलांटिक महासागरात मिळते तिथे हूड आणि प्रिन्स ऑफ वेल्स सापळा रचणार होत्या. म्हणजे बिस्मार्क आणी प्रिन्स युजेन डेन्मार्क च्या समोर हूड आणि प्रिन्स ऑफ वेल्स 
आणि मागे HMS नोर्फोल्क आणि HMS saffolk  !  जर्मन नौकांना पलायन करण्यासाठीही वाव ठेवायचा नाही असा डाव होता . उत्तर अटलांटिक महासागराच्या तोंडाशी सकाळच्या उजेडात जर्मन युद्धनौकांना गाठायचे आणि बुडवायचे अशी ब्रिटिशांची योजना होती  .  पण २3 आणि २4  मेच्या रात्री काहीवेळ ब्रिटीश नौकांचा जर्मन नौकांशी रडार  संपर्क तुटला आणि वेळेचे गणित चुकले . जर्मन युद्धनौका ब्रिटीशांच्या आधीच अटलांटिक महासागराच्या तोंडाशी पोचल्या आणि त्यांना याचा व्यूहात्मक फायदा मिळाला (आपली युद्ध नौका शत्रूला समांतर असेल तर आपल्या पुढच्या आणि मागच्या अशा दोन्ही तोफांचा मारा शत्रूवर करता येतो .पण जर आपली युद्ध नौका काटकोनात असेल तर  फक्त नाळीच्या तोफांचा वापर करता येतो) . २४ मे ला पहाटेच्या मंद प्रकाशात ५. ३५ वाजता जर्मन नाविक टेहळ्याना  क्षितिजावर धूर दिसला आणि त्यांनी लगेच ब्रिटीश नौकांना ओळखले. तिकडे प्रिन्स ऑफ वेल्स वरील टेहळ्यांनीही  जर्मन युद्ध नौका ओळखल्या .   पहाटे  ५. ५२ ला दोनीही आरमारे एकमेकांपासून २६००० यार्ड अंतरावर आली आणि प्रिन्स ऑफ वेल्स वरील तोफा कडाडल्या. साधारण त्यानंतर एका मिनिटाच HMS हूड वरील तोफांनी जर्मन  आरमाराच्या दिशेने तोफगोळे डागले. बिस्मार्क आणि युजेन च्या दोन्ही बाजूस समुद्र पाण्याचे कैक मीटर उंच मनोरे उडाले. मात्र एच एम एस हुड कडून एक मोठी चूक झाली होती . जवळपास  २६ किमी वरून युजेन आणि बिस्मार्क च्या आकृत्या सारख्याच दिसत होत्या.  त्यामुळे पुढे असलेल्या युजेनलाच बिस्मार्क समजून हुडने गोळाबारी केली होती.  बिस्मार्क वर फर्स्ट गनरी ऑफिसर  Adalbert Schneider ने प्रत्युतराची परवानगी मागितली . पण आश्चर्यकारक रित्या काहीच उत्तर आले नाही . ऍडमिरल  Günther Lütjens आणि कप्तान Ernst_Lindemann यामध्ये मतभेद आले. ऍडमिरल  Günther Lütjens च्या दृष्टीने ब्रिटीश आरमाराशी पंगा  घेण्यापेक्षा  रसद पुरवठा घेऊन येणाऱ्या जहाजांना लक्ष्य करणे महत्वाचे होते . किंबहुना ही मोहीम त्याच साठी होती. होता होईल तो ब्रिटीश आरमाराशी संघर्ष तो टाळत होता. कप्तान   Ernst_Lindemann  ला मात्र त्याच्या जहाजाची काळजी होती .  त्याने वरिष्ठाची आज्ञा मोडीत काढून ५. ५५ वाजता बिस्मार्क च्या तोफाखान्यास प्रत्युत्तराचे आदेश दिले . त्याच्याच शब्दात सांगायचे  झाले तर   तो  म्हणतो  "I will not let my ship be shot out from under my ass ! " बिस्मार्क ने आपल्या तोफांना बत्ती दिली . आधी पोचून तिला  व्यूहात्मक फायदा मिळालाच  होता . तिच्या चारही मुख्य तोफातून ब्रिटीश आरमारावर गोळाबारी सुरु झाली . ब्रिटीश
नौका मात्र फक्त पुढच्या तोफाच वापरू शकत होते . हुड कितीही शस्त्र सज्ज असली तरी तिच्यात एक कमजोरी होती . ते म्हणजे तिचे डेक कवच  कमकुवत होते .जर्मन तोफगोळे थेट डेक वर पडू नयेत आणि आपला सर्व तोफखाना वापरता यावा  म्हणून कॅप्टन  हॉलंड ने हूड २० अंशाने वळवली . तिकडे बिस्मार्क आणि युजेन ने  हूड ला लक्ष्य करीत  पुन्हा तोफा  डागल्या . युजेनचा एक ८ इंची तोफ गोळा हूड वर आदळला आणि त्यामुळे हूड वर आग लागली . पण ती तत्काळ विझवण्यात आली . पहिल्या गोलाबारीत बिस्मार्कच्या तोफचीना हुड चा अंतराचा अचूक अंदाज आला . आणि त्यानी बिस्मार्कच्या मुख्य १५ इंची तोफांना हूडच्या दिशेनी बत्ती दिली . आणि ६ इंची तोफांनी प्रिन्स ऑफ वेल्स वर  हल्ला केला . बिस्मार्क च्या १५ इंची तोफेतून निघालेला एक गोळा अचूक हूडच्या डेक वर आदळला आणि त्याखालीच असलेल्या ३०० टन दारू गोळ्याच्या कोठारातुन प्रथम आपल्या दिवाळीतील भुईनळ्या तुन जसे आगीचे कारंजे उडते , तसे उडाले आणि मग  प्रचंड स्फोट झाला .  क्षणार्धात आगीचे रुपांतर भडाग्नीत झाले . हूडचे दोन भाग झाले आणि काही कळायच्या आत हूड आपल्या १४१५ नौसैनिकांसाहित समुद्रतळास गेली . १४१८ पैकी फक्त ३ नौसैनिक वाचले. 




 आता युजेन आणि बिस्मार्कच्या तोफांनी प्रिन्स ऑफ वेल्स कडे मोर्चा वळवला . प्रिन्स ऑफ वेल्सने 
सुद्धा प्रत्युत्तर दिले . प्रिन्स ऑफ वेल्स वरून उडालेला १४ इंची गोळा बिस्मार्क च्या नाळे वर वर एका बाजूने आदळला आणि पलीकडून इंधनाच्या टाकिस छेद देऊन बाहेर पडला . त्यामुळे इंधन गळती सुरु झाली. बिस्मार्क वरून डागलेले ४ तर युजेन वरून डागलेले ३ गोळे प्रिन्स ऑफ वेल्स वर आदळले होते ज्यामुळे १४ नौसैनिक ठार झाले .गोलबारीत तिच्या तोफाही जाम झाल्या होत्या .  आपण एकटे पडलोय हे  लक्षात घेऊन प्रिन्स ऑफ वेल्स ने काढता पाय घेतला. Lindemann ला तिचा पाठलाग करण्याची इच्छा होती पण ऍडमिरल Lütjens ने ती फेटाळून लावली. जर्मन युद्धनौकांनी तिचा पाठलाग केला नाही. 
हूडला जलसमाधी दिल्यामुळे बिस्मार्क वर काही काळ  विजयोत्सवाचे वातावरण होते . कर्मचारी वर्गास अतिरिक्त अन्न आणि सिगारेट्स देण्यात आल्या. पण ऍडमिरल  Günther Lütjens  ला मात्र बिस्मार्क चे आणि या मोहिमेचे भवितव्य दिसू लागले असणार. आपण हुड ला बुडवून ब्रिटीश आरमाराचा स्वाभिमान डिवचला आहे हे त्याने ओळखले . आता हुड चा बदला घेण्यासाठी ब्रिटीश सर्वस्व पणास लावणार हे नक्की होते.
तिकडे संपूर्ण जगात हूड बुडाल्याची बातमी रेडीओ वरून प्रसारित होत होती . जर्मनीत आनंदोत्स्तव सुरु झाला तर ब्रिटन मध्ये हाहाकार उडाला . थोड्याच वेळात  पंतप्रधान चर्चिल   यांनी काढलेला आदेश ब्रिटीश आरमाराच्या  अधिकाऱ्यांच्या हातात पडला "SINK THE BISMARCK !!! "
======================================================

 प्रिन्स ऑफ वेल्स वरून आदळलेल्या गोळ्याने जी इंधन गळती सुरु झालेली ती अतिशय गंभीर बाब
होती.  मुळातच घाई घाईत निघाल्याने बिस्मार्क ची इंधन टाकी पूर्ण भरता आली नव्हती. त्यात हे इंधन
गळतीचे संकट उभे राहिले. बिस्मार्क आता इंधन वाचवून चालवावी लागणार होती. त्यामुळे  ३० ते ३५
समुद्री मैलाचा वेग हे जे  तिचं एक बलस्थान होत ते नाहीसं झाले होते. आता तिला इंधन वाचवण्यासाठी मर्यादित वेगात म्हणजे २८ समुद्री मेल प्रति तास  या वेगात मार्ग क्रमण करावे लागणार होते. शुवाय तिच्या एका कंपरर्ट्मेण्ट मध्ये समुद्री पाण्याची गळती सुरु झाली होती. त्यामुळे पाणी भरून बिस्मार्क थोडी एका बाजूला कलली होती.  तरीही बिस्मार्क अजूनही लढण्यास सक्षम असथेत होती. आतापर्यंतच्या लढाईत तिचा कोणताही कर्मचारी मारला गेला नव्हता. फक्त प्रिन्स ऑफ वेल्स च्या गोलबारीत ५ जण किरकोळ जखमी झाले होते.  आता बिस्मार्क कडे ३००० टना पेक्षा कमी इंधन उरले होते. या नुकसानी मुळे Operation  Rheinubung आता पुढे रेटणे कठीण झाले होते. शिवाय या मोहिमेची गुप्तता संपली होती.  हूड च्या नाशाचा बदला घेण्यासाठी ब्रिटिश आरमार आपले सर्वस्व पणाला लावणार यात तर काही वादच नव्हता.  ऍडमिरल  Günther Lütjens कडे आता दोन पर्याय होते.
१. आल्या मार्गाने  आइसलँड च्या बाजूने  परत जाऊन नाझी पादाक्रांत नॉर्वेत बर्गेन बंदरात आसरा घ्यायचा
प्रयत्न करणे. (आकृतीमधील लाल रंगाने दाखवलेला मार्ग)
२. उत्तर अटलांटिक मधून प्रवास करून नाझी व्याप्त फ्रांस मधील सेंट नाझाईरे या बंदरात आसरा घेणे. 
(आकृती मधील निळ्या  रंगाने दाखवलेला मार्ग)





पहिला पर्याय होता त्यात ऍडमिरल  Günther Lütjens ला धोका वाटत होता. पहिल्या पर्यायातील मार्गावर ब्रिटिश नौदल त्यांची वाटच  पाहत असेल अशी शक्यता खूप होती. दुसऱ्या पर्यायात लांबचा वळसा पडणार असला तरी तिथे ब्रिटिश आरमार पोहोचायला बराच वेळ लागणार होता. आपल्या वेगाचा फायदा घेऊन ब्रिटिश आरमारास चकवून बिस्मार्क ला फ्रांस ला नेणे  Lütjens ला जास्त सयुक्तिक वाटले. शिवाय एकदा फ्रांस मधील लुफ्टवाफ च्या संरक्षणाखाली गेल्यावर बिस्मार्क अजून सुरक्षित रित्या बंदरात पोहोचवता आले असते.  Lütjens  ने दुसरा पर्याय निवडला. 

ऍडमिरल Lütjens ने मग या लढाईत एकही घाव न बसलेल्या प्रिन्स युजेनला अटलांटिक मध्ये आपली
मोहीम चालू ठेवण्यासाठी बिस्मार्क पासून वेगळे करून पुढे पाठवले. प्रिन्स युजेन ला वाट मोकळी करून देण्यासाठी बिस्मार्कने स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घातली आणि पाठलाग करणाऱ्या HMS नोर्फोल्क आणि HMS saffolk वर एकदा तोफानी मारा केला. HMS नोर्फोल्क आणि HMS saffolk या बिस्मार्कशी लढण्यासाठी दुबळ्या होत्या. त्यांनी अजून माघार घेतली. याचा फायदा घेऊन  प्रिन्स युजेन  ब्रिटिशां च्या रडारवरून दिसेनाशी झाली.  (प्रिन्स युजेन पुढे दक्षिण अटलांटिक मध्ये गस्त घालत गेली, तिने एका टँकर मधून इंधन भरून घेतले. पुढे तिच्या इंजिनात बिघाड झाल्याने मोहीम अर्धीच टाकून तिलाब्रेस्ट या बंदरात परतावे लागले.)

इकडे अपेक्षे प्रमाणे खवळलेल्या ब्रिटिश आरमाराने बिस्मार्क ला बुडवायचेच या निश्चयाने तयारी सुरु केलीच होती.ब्रिटिश नाविक सेनानींनी बिस्मार्कला रोखण्यासाठी लगेच आपले आरमार ठिकठिकाणी पाठवले. खुद्द इंग्लंड मधून होम फ्लीट  डेन्मार्क च्या समुद्रधुनीकडे बिस्मार्कला अडवायला निघाली. जिब्राल्टर च्या खाडीतून फोर्स एच हा ब्रिटिश आरमारी बेडा निघाला.  HMS नोर्फोल्क आणि HMS saffolk या दोन स्क्रूझर आणि मागच्या लढाईत जखमी झालेले प्रिन्स ऑफ वेल्स बिस्मार्क शी रेडिओ संपर्क ठेवून चालत होते. जर्मन पाणबुड्यांच्या धोक्यापासून वाचण्यासाठी ब्रिटिश नौका झिग झ्याग पद्धतीने चालत होत्या. फ्रांस मध्ये सुरक्षित पोहोचण्यासाठी बिस्मार्क ला ब्रिटिश नौकांना चकवून जाणे ही आवश्यक होते.  Lütjens   ने ब्रिटिश नौका च्या झिग झ्याग च्या वेळीच बिस्मार्क अशा पद्धतीने वळवले की ब्रिटिश नौकांच्या रडारच्या कक्षेतून बिस्मार्क बाहेर पडले. पण जर्मनांच्या दुर्दैवाने  त्यांना आपण ब्रिटिश आरमाराच्या रडार कक्षेच्या बाहेर पडलोय हे माहित नव्हते. त्यांना अजूनही ब्रिटिश नौका त्यांच्या रडारवर दिसत होत्या.  त्यामुळे आपण सुद्धा ब्रिटिशाना दिसत असणार या भ्रमात ते राहिले. बिस्मार्क रडार वरून नाहीसे झाल्यावर ब्रिटिश आरमाराचे धाबे दणाणले. आता त्यांना अफाट पसरलेल्या समुद्रात बिस्मार्कला हुडकावे लागणार होते. पण ऍडमिरल  Günther Lütjens ने त्यांचा प्रश्न स्वतःहून सोडवला. जवळपास ५ तास बिस्मार्क ब्रिटिश रडार वरून  गायब होते .   आपण ब्रिटिशाना चकवलंय हेच त्याला माहित नव्हते. त्यामुळे २६ मे रोजी सकाळी ७ वाजता त्याने एक मोठा रिपोर्ट रेडिओ शांतता (Radio Silence) तोडून  बर्लिन ला पाठवला. हा रिपोर्ट बर्लिन बरोबरच ब्रिटिश आरमाराने पण रिसिव्ह केला. त्यावरून ब्रिटिश अभियंत्यांनी बिस्मार्कचे साधारण लोकेशन शोधले. आणि अधिक अचूक लोकेशन मिळवण्यासाठी त्यांनी त्यांची कॅटलिना ही टेहळणी विमाने  पाठवली. या विमानांनी अचूक कामगिरी केली. दाट  ढगातून एक सुदैवी क्षणी त्यांनी बिस्मार्कला शोधले आणि त्याचे लोकेशन मुख्य नियंत्रण कक्षास कळवले. आता बिस्मार्कला शोधले तर होते.
पण बिस्मार्क वेगाने फ्रान्सच्या सुरक्षित बंदराकडे वाटचाल करत होते. लवकरच ते लुफ्टवाफ च्या
संरक्षणाखाली जाणार होते. नुसत्या युद्ध नौकानी पाठलाग करून आता बिस्मार्कला गाठणे अशक्य होते. ब्रिटिश आरमाराकडे आता एकच पर्याय होता. बिस्मार्क वर हवाई हल्ला करणे. पण असा हल्ला करणार कोठून हा मोठाच प्रश्न होता. ब्रिटनचे हवाई तळ खूप लांब होते. सुदैवाने ब्रिटिश आरमाराच्या फोर्स एच या आरमारी बेड्यातील आर्क रॉयल ही विमानवाहू युद्ध नौका बिस्मार्कच्या मागावर होती. आर्क रॉयल वरील विमानांनी हल्ला करून बिस्मार्क बुडवणे, किमान त्याचा वेग कमी करणे हा एकमेव पर्याय ब्रिटिश सेनानींकडे होता. लगेच  आर्क रोयल वरील सोर्डफिश ही टॉर्पेडो हल्ला करणारी विमाने उडाली. हवामान खूप खराब असतानाही या विमानांनी बिस्मार्कच्या दिशेने उड्डाण केले. सोर्डफिश ही तांत्रिक दृष्ट्या जुनी आणि संथ वेगाची विमाने होती. त्यातील पहिल्या तुकडीने HMS शेफील्ड या त्यांच्याच ब्रिटिश जहाजाला बिस्मार्क समजून त्यावर टॉर्पेडो हल्ला केला. त्या टोर्पेडो ना नवीन मॅग्नेटिक डेटोनेटर्स बसवले होते. त्यांच्यातील काही त्रुटींमुळे ते टोरपीडो फुटले नाहीत. तिकडे बिस्मार्क फ्रान्सच्या संरक्षित क्षेत्राकडे वेगाने वाटचाल करत होती. हवामान अजूनच खराब झाले होते. इतके की आर्क रॉयल वरील कर्मचाऱ्यांना सोर्डफिश विमानांवर टोरपीडो सुद्धा लोड करताना त्रास होत होता. पण कसेबसे तयार होऊन त्यांनी दुसरा हल्ला लाँच केला. या वेळी मात्र
त्यांनी जुने डेटोनेटर बसवलेले टोरपीडो विमानांत बसवले. २६ मे १९४१ रोजी सकाळी ७.१० वाजता प्रचंड खराब हवनमानात १५ सोर्डफिश विमानांची दुसरी तुकडी   बिस्मार्कवर हल्ला करायला निघाली.

एखाद्या अजस्र हत्तीवर मधमाश्यानी तुटून पडावं तसं ९० फूट उंचीवरून उड्डाण करत या विमानांनी
बिस्मार्कवर हल्ला चढवला. बिस्मार्क वरील १०.५ से. मी. च्या विमानभेदी तोफा त्यांच्या विरुद्ध धडाडू
लागल्या. पण हा विमानभेदी तोफखाना जुनाट तंत्राचा होता हे मागे सांगितलेच आहे. त्यांचा तोफखाना
चालवणारा कर्मचारीवर्ग सुद्धा निष्णात नव्हता. खूप कमी उंचीवरून समुद्राला समांतर उडत येण्याऱ्या
विमानांविरुद्ध हा तोफखाना कुचकामी ठरला. या तोफाची तोंडे इतक्या कमी उंचीवरून उडणाऱ्या
विमानाच्या विरोधात खाली करताच येत नव्हती. बिस्मार्कच्या मुख्य  तोफा सुद्धा या विमान हल्ल्याविरुद्ध गोळे टाकू लागल्या. या गोळाबारीमुळे समुद्राच्या पाण्यात उंचच उंच पाण्याचे मनोरे उभे राहत होते आणि कोसळत होते. यातून वाट काढत ब्रिटिश विमाने बिस्मर्कला लक्ष्य करू पाहत होती.
आश्चर्यकारकरित्या  एकही ब्रिटीश विमान या हल्ल्यास बळी पडले नाही. एका विमानातून सोडलेला पाणतीर बिस्मार्कच्या मध्यावर आदळला पण त्याने फार नुकसान झाले नव्हते. दुसऱ्या एका सोर्डफिश विमानाने ९० यार्ड दुरून सोडलेला एक पाणतीर (टोरपीडो) बिस्मार्कच्या मागील रडर वर आदळला. (रडार आणि रडर वेगळे. रडर म्हणजे जहाज वळवण्यासाठी जहाजाच्या मागील बाजूला एक उभी पट्टी असते ती.) या आघाताने पोर्ट आणि स्टारबोर्ड रडर एका वळलेल्या पोसिशन ला अडकून बसले.बिस्मार्क वरील अभियंत्यांनी स्टार बोर्ड रडर दुरुस्त केला पण पोर्ट रडर दुरुस्तीच्या पलीकडे होता. रडर तुटल्याने बिस्मार्क हवी तशी वळू शकत नव्हती. गोल गोल फिरत राहणे इतकेच तिच्या नशिबी होते.  मुख्य तोफखाना  शाबूत असला तरी आता बिस्मार्क अपंग झाली होती. एखाद्या सगळे पाय तुटलेल्या पण नांगी शिल्लक असलेल्या विंचवासारखी! आता पुढचा हल्ला कधी होणार याची वाट पाहत बसण्याखेरीज तिच्या हातात काहीच नव्हते. ऍडमिरल  Günther Lütjens ने हिटलरला सर्व वृत्तांत कळवला. तो लिहितो "Ship unmanoeuvrable. We will fight to the last shell. Long live the Führer" "सर्व जर्मन जनता तुमच्या पाठीशी आहे"; असे  हिटलर  चे उत्तर आले.  

आपल्या हल्ल्याने नक्की काय परिणाम झालाय हे ब्रिटिशाना कळले नव्हते. पण बिस्मर्कची गती आणि दिशा यावरून त्यांनी अंदाज बांधला की बिस्मार्क गंभीर जखमी झालीये. त्यांनी आपला उपलब्ध होऊ शकणारा सर्व आरमारी बेडा गोळाकरून बिस्मार्कच्या विरोधात पाठवला. वळू न शकल्याने बिस्मार्क आता थेट ब्रिटिश शाही नौदलाच्या जबड्यात शिरत होती. ती  एकाच वेळी १५००० पौंड दारुगोळा शत्रूवर फेकू शकत होती. पण आता ती एकास पाच या प्रमाणात बलाढ्य शत्रूच्या माऱ्यात सापडणार होती. तिच्यावरील कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य कमालीचे खालावले होते. अंत त्यांना दिसू लागला होता. २६ मी च्या रात्री बिस्मार्क वरून Sheffield या स्क्रूझर वर गोळाबारी झाली. Sheffield या स्क्रूझर ताबडतोब पळून पल्ल्या बाहेर जाऊन थांबली. सकाळपर्यंत थांबायचे ब्रिटिशांनी ठरवले. 
२७ मे १९४१ सकाळी ब्रिटिश नौसेनानी ऍडमिरल टॉवी यांच्या ताफ्यातील दोन  युद्ध नौका रणक्षेत्रात
दाखल झाल्या. एक होती HMS Rodney, दुसरी किंग जॉर्ज ५. सकाळी ८. ४५ ला त्यांनी बिस्मार्क वर तोफा डागण्यास सुरुवात केली.  त्यांना HMS डॉरशेटशायर  , HMS नोर्फोल्क  या सामील झाल्या. या सगळ्यांनी बिस्मार्क वर तुफानी गोळाबारी केली. बिस्मार्क ने पण त्यांना प्रत्युत्तर दिले. पण आता रडर अडकल्याने तिला वळता येत नव्हते. त्यामुळे तिच्या माऱ्यात अचूकता नव्हती. एखाद्या जखमी आणि अपंग वनराजावर लांडग्यांनी  तुटून पडावे आणि वनराजाचे लचके तोडावेत  अशी तिची अवस्था होती. २७ मे  १९४१ च्या सकाळी ८. ५९ ला ब्रिटिश गोळाबारीने बिस्मार्कचे पुढचे दोन टरेट निकामी झाले.  नोर्फोल्क च्या एका गोळ्याने वरच्या मजल्यावरील फायर कंट्रोल स्टेशन निकामी केले. ब्रिटिशांनी प्रचंड गोळाबारी केली. काही वेळातच बिस्मार्क वरील क्याट्यापुल्ट निकामी झाले. एकही विमान उडवायचे या  क्याट्यापुल्ट च्या नशिबात नव्हते ! 
तोफांना मार्गदर्शक असणारे मुख्य डायरेक्टर निकामी पडल्याने बिस्मार्कच्या तोपचिंनि लोकल कंट्रोल
वापरून उरलेल्या टरेट च्या तोफा वापरून मारा केला. आता त्यांना एकावेळी एकच शत्रू जहाज लक्ष करता येत होते. पण यांनी काही विशेष परिणाम झाला नाही. ब्रिटिशांनी जोरदार मारा करून बिस्मर्कला जायबंदी केले. ०९. ३१ ला बिस्मार्क च्या तोफा शांत पडल्या !  मधल्या काळात जर्मन वेळेनुसार सकाळी 0710 ला  “Send U-Boat to Save War Diary.” असा  ऍडमिरल  Günther Lütjens ने संदेश पाठवला. हा त्याच्याकडून गेलेला शेवटचा संदेश होता. ऍडमिरल  Günther Lütjens आणि कप्तान  Ernst_Lindemann कुठे आणि कधी मारले गेले हे समजत नाही. पण  Lütjens बहुदा Rodney  या युद्ध नौके वरून  केलेल्या  गोळाबारीत  इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मारला गेला . Ernst_Lindemann सकाळी ०८०० वाजता लढाईच्या थोडाच आधी कमांड ब्रिज वर शेवटचा दिसला. पुढे त्याचे काय झाले हे निश्चित समजत नाही.   
अजूनही बिस्मार्क मध्ये रेडिओ , इलेक्ट्रिकल अभियंते आपापली पोसिशन धरून होते. बिस्मार्कच्या तोफा  थंड पडल्यावर ब्रिटिश जहाजे तिच्या जवळ येऊन तिला घेरू लागली. त्यांनी आता अगदी २ मैलांवरून बिस्मार्क वर तोफा डागल्या. कर्मचारी वर्ग जीव वाचवण्यासाठी आता धावू लागला. डेक वर मृतांचा आणि बिस्मार्कच्या अवशेषांचा खच पडला होता. अनेकांनी आगीपासून वाचण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या. 



बिस्मार्क एका बाजूला कलली होती. पण बुडली नव्हती. तिने शरणागती पण पत्करली नव्हती. ब्रिटिश
आरमार सुद्धा इंधन टंचाईचा सामना करत होते. ब्रिटिश ऍडमिरल टोबीने आता     डॉरशेटशायर सोडून बाकी युद्धनौका काढून  घेतल्या.  डॉरशेटशायर ने बिस्मार्क वर टॉर्पेडो हल्ला केला. २७ मे १९४१ च्या सकाळी १०. ३९ वाजता बिस्मार्क ला समुद्राने पोटात घेतले. त्यानंतर  समुद्रावर तेल, जहाजाचे अवशेष आणि जीव वाचवण्यासाठी धडपणारे आणि किंचाळणारे जर्मन खलाशी यांचे अस्तित्व होते ! या खलाशांना डॉरशेटशायर ने वर घेतले. काही खलाशी लाटांच्या तडाख्यात  डॉरशेटशायर वर आपटून बेशुद्ध झाले आणि बुडाले. काही कुठच्या कुठे वाहून गेले. बिस्मार्क वरील एका वाचलेल्या सैनिकाच्या म्हणण्या प्रमाणे डॉरशेटशायर वरील तासभरापूर्वी त्यांचावर गोळ्या चालवणारे ब्रिटिश सैनिक त्यांना आता भावाप्रमाणे वागवत होते! तितक्यात  डॉरशेटशायर ला एका जर्मन यु बोटीचे अस्तित्वाची चाहूल लागली. अशी कोणती यु बोट तिथे होती याचा कधीच तपास लागला नाही. पण धोका न पत्करता  डॉरशेटशायर ने  जवळपास ८०० तरंगणाऱ्या जर्मन सैनिकांना त्यांच्या नशिबावर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला.  डॉरशेटशायर आणि माओरी या युद्धनौकांनी बिस्मर्कवरील एकूण  १११ खलाशी वाचवले. त्यातील एक जण दुसऱ्या दिवशी जखमांनी मृत्युमुखी पडला. या सर्वांची रीतसर चौकशी करून त्यांना युद्ध कैदी म्हणून  दुसरीकडे पाठवण्यात आले.   डॉरशेटशायर वरील जॉन ब्रुक्स नावाच्या खलाशाने समुद्रात उडी मारून एका दोन्ही हात तुटलेल्या
जर्मन नाविकास वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या "शौर्या" बद्दल त्याला डॉरशेटशायर चा कप्तान
बेंजामिन मार्टिन याने "विना परवानगी जहाज सोडल्या"  बद्दल अटक केली !
नाझी यु बोट प्रमुख ऍडमिरल कार्ल डोइनॆट्झ ने यु बोटींना बिस्मार्कच्या मदतीस जाण्यास फर्मावले. फक्त यू -
५५६ वेळेवर पोहोचू शकली. पण ती एक महिन्यांच्या समुद्री मोहिमेतून आलेली होती आणि तिच्यावर
एकही पाणतीर शिल्लक नव्हता. ब्रिटिश विमानवाहू नौका आर्क रॉयल आणि Renown तिच्या समोरून जात असताना हताशपणे पाहण्यापलीकडे यु ५५६ च्या हातात काहीही नव्हते. 

ब्रिटिश   ऍडमिरल जॉन टॉवी यांनी "The Bismarck had put up a most gallant fight against
impossible odds worthy of the old days of the Imperial German Navy, and she went down with her colours flying"असे उद्गार  काढले.
या लढाईत हूड सोडली तर एकही ब्रिटिश  जहाज  किंवा विमान नष्ट झाले नाही. पण दुसऱ्या दिवशी २८ मे ला ब्रिटिश जहाजे परतत असताना लुफवाफ ने हल्ला करून HMS Mashona ही  विनाशिका बुडवली. 

दुसया दिवशी जर्मनीने यू ७४ ही पाणबुडी बिस्मार्कचे लॉग बुक ताब्यात घ्यायला पाठवली. तिने तराफ्यावर जीव वाचवलेले अजून ३ जर्मन खलाशी वाचवले. दुसऱ्या एका जर्मन बोटीने (Sachsenwald ) असेच तराफ्यावरील अजून दोन खलाशी वाचवले.  

बिस्मार्क वरील २२०० सैनिकांना अटलांटिक महासागराने पोटात सामावून घेतले. फक्त ११० सैनिक
वाचले. ब्रिटनने हूड च्या अपमानाचा बदला घेतला. 
या नाविक रणसंग्रामातील मुख्यत्वे  अधोरेखित झालेल्या गोष्टी आणि परिणाम :
१.  Operation  Rheinubung ही मोहीम जवळपास पूर्ण बारगळली. 
२. नाझींनी पुन्हा कधीही आपल्या बिनीच्या  युद्धनौका पणाला लावल्या नाहीत. 
३. तीन दिवसाच्या आत हूड चा बदला घेऊन ब्रिटिशांनी जर्मन जनतेचे मनोधैर्य खच्ची केले. 

४. विमान वाहू युद्ध नौकांचे महत्व अधोरेखित झाले.
५. नौदलाबरोबरच त्याला हवाई संरक्षण देणे आवश्यक आहे हे सिद्ध झाले. 
६. बिस्मार्क ला एकटे अटलांटिक मध्ये अपूर्ण तयारीनिशी पाठवण्याचा निर्णय घातकी ठरला. 

या लढाईत उल्लेखित बाकीच्या जहाजांचे पुढे काय झाले?
१. HMS Norfolk - ३ जानेवारी १९५० ला भंगारात काढले गेले. 
२. HMS Suffolk-  १९४८ साली भंगारात काढले गेले. 
३. प्रिन्स ऑफ वेल्स (५३) - १० डिसेंबर १९४१ रोजी जपानी हल्ल्यात बुडवले गेले 
४. आर्क रॉयल  (विमानवाहू ) - १४ नोव्हेंबर १९४१ ला जर्मन पाणबुडी  यु - ८१ कडून जलसमाधी
५. प्रिन्स युजेन (जर्मन उच्चार ओयगेन)  या महायुद्धात सहीसलामत वाचलेल्या मोजक्या नाझी जहाजांपैकी हे  एक जहाज होते. पुढे ते अमेरिकन नौदलात सामील झाले. डिसेंबर १९४६ ला एका अणु चाचणीत ते नष्ट झाले.
६. HMS डॉरशेटशायर (40) - ५ एप्रिल १९४२ ला भारतीय समुद्रात जपानी हवाई हल्ल्यात बुडाली.
७. ८ जून १९८९ रोजी रॉबर्ट बॅलार्ड याने समुद्रातील बुडालेल्या बिस्मार्कचे अवशेष शोधून काढले. 
८. HMS Rodney - २६ मार्च १९४८ ला भंगारात काढले
९. किंग जॉर्ज ५ - १९५७ साली भंगारात काढले.

परिसमाप्ती आणि लेखनसीमा !
कौस्तुभ पोंक्षे
सुचना :- ह्या पोस्टमधील शब्दांकन (कौस्तुभ पोंक्षे ©) कॉपीराईट आहे.

Comments